पुरुषांनीही घेतला मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांचा अनुभव; अक्षरशः किंचाळू लागले, पाहा VIDEO

पुरुषांनीही घेतला मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांचा अनुभव; अक्षरशः किंचाळू लागले, पाहा VIDEO

पीरियड क्रॅम्प स्टिम्युलेटर (Period Cramp Stimulator) या यंत्रानं मित्र-मैत्रिणींच्या एका गटाने वेदनांचा अनुभव घेतल्याचं या व्हिडिओत दिसतं आहे. स्त्रिया आणि पुरुष यांच्या वेदनांचा अनुभव कसा वेगवेगळा आहे, हे यात पाहायला मिळतं.

  • Share this:

मुंबई 10 मे : मासिक पाळी (periods) हा महिलांच्या आयुष्याच्या दीर्घ कालावधीत दर महिन्याला अनुभवावा लागणारा कठीण काळ. काही जणींना या काळात पोटात खूप दुखतं, तर काही जणींना जास्त रक्तस्रावामुळे (Bleeding) दुर्बलता येते. या काळात दुसरं काहीही करू नये, असंही अनेकींना वाटतं. या काळात अनेकींचे मूड स्विंग्ज (Mood Swings) होतात. या सगळ्या मागचं कारणही या काळातली शारीरिक अस्वस्थता हे असतं. पण बऱ्याचदा स्त्रीच्या या काळातल्या वेदनांकडे तिचे सहकारी, मित्रमंडळी, कुटुंबीय आदी वर्तुळातल्या पुरुषांकडून दुर्लक्ष केलं जातं किंवा काही वेळा टिंगलही केली जाते.

स्त्रिया किती कमजोर असतात, वगैरे अशा आशयाचे टोमणेही मारले जात असल्याचे अनुभवही अनेकींना आले असतील. या पार्श्वभूमीवर, मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना किती वेदना होतात, याचा कृत्रिम अनुभव देणाऱ्या यंत्राबद्दलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पीरियड क्रॅम्प स्टिम्युलेटर (Period Cramp Stimulator) असं या यंत्राचं नाव असून मित्र-मैत्रिणींच्या एका गटाने या यंत्रावर वेदनांचा अनुभव घेतल्याचं या व्हिडिओत दिसतं आहे. स्त्रिया आणि पुरुष यांच्या वेदनांचा अनुभव कसा वेगवेगळा आहे, हे यात दिसतं आहे. 'इंडिया टुडे'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

या यंत्रावर एक पुरुष पहिल्यांदाच पीरियड क्रॅम्पचा (Period Cramp) अनुभव घेत असल्याचं व्हिडिओत दिसतं. वेदनांची तीव्रता इतकी असते, की तो अक्षरशः जमिनीवर पडतो. यंत्राच्या 'लेव्हल10'वर त्याला इतक्या वेदना होत असल्याचं व्हिडिओत सांगण्यात आलं आहे. त्याच्यानंतर एक महिला त्या यंत्रावर 'लेव्हल10'चाच अनुभव घेते. तिच्या चेहऱ्यावर वेदनेची एखादी सूक्ष्म लहरही दिसत नाही.त्यानंतर त्याच लेव्हलला आणखी दोन महिला आणि पुरुष यंत्राचा अनुभव घेतात. पुरुष अजिबातच वेदना सहन करू शकत नाहीत. त्यामुळे, ते तातडीने यंत्र थांबवायला सांगतात. एकाने म्हटलं, 'तुम्ही एवढ्या वेदना घेऊन कशा वावरू शकता?'

या व्हिडिओतल्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर मात्र वेदनेचा लवलेशही दिसत नाही. त्यापैकी एका स्त्रीने तर सांगितलं, की तिच्या मासिक पाळीच्या (Menstrual Cycle) वेदना यापेक्षा किती तरी पटींनी अधिक असतात. स्त्रियांची मासिक पाळी किती वेदनादायी असते, याबद्दल जागृती करणं हा व्हिडिओचा उद्देश आहे. या व्हिडिओवर नेटिझन्सनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त दिल्या आहेत. काही जणांनी व्हिडिओ फनी असल्याचं म्हटलं आहे, तर काही जणांनी शैक्षणिक उद्देशासाठी या व्हिडिओचा उपयोग करायला हवा, असं म्हटलं आहे.

'अधिकारी पदावर असलेल्या प्रत्येक पुरुषाने महिन्यातून पाच दिवस हे यंत्र वापरलं पाहिजे, असं मला वाटतं' असं एका युझरने म्हटलं आहे. 'पुरुष कमकुवत असतात, हा याचा निष्कर्ष' असं एका युझरने म्हटलं आहे. एकीने म्हटलंय, 'तरी हे यंत्र बाहेरूनच अनुभव देतं. दर महिन्याला अख्खा अवयवच जणू जुनं रूप टाकून नवं घेतो, तसं हे नाहीये. स्त्रियांना माहिती आहे, की आपण पुरुषांपेक्षा कणखर आहोत. ही आमच्यासाठी बातमी नाही.'

'हायस्कूलमध्ये सेक्स एज्युकेशनमध्ये (Sex Education) याबद्दल उल्लेख व्हायला हवा,'अशी प्रतिक्रिया एकीने व्यक्त दिली. एकीने असं म्हटलंय, की जगातल्या सर्व पुरुषांना हे यंत्र वापरणं कायद्याने बंधनकारक केलं पाहिजे. 'दर 26 ते 32 दिवसांनी दोन दिवसांची मेन्स्ट्रुअल लिव्ह (Menstrual Leave) नाकारणाऱ्या बॉसवर आम्ही या यंत्राचा वापर करू शकतो का? हे उपकरण सहवेदना शिकवेल ,' अशी अपेक्षा एकीने व्यक्त केली आहे.

'पीरियड लिव्हज (Period Leaves) ऑप्शनल का असतात,' असा प्रश्नही एकीने विचारला आहे. 'तरी हा अनुभव फक्त क्रॅम्प्सबद्दलचा आहे. मासिक पाळीतल्या बाकीच्या वेदनांचं काय,' असंही एकीने म्हटलं आहे.एकंदरीत या व्हिडिओने मासिक पाळीत स्त्रियांना अनुभवाव्या लागणाऱ्या वेदनांना वाचा फोडली आहे.

Published by: Kiran Pharate
First published: May 10, 2021, 6:02 PM IST

ताज्या बातम्या