मुंबई, 8 मे : खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएलचा यंदाचा मोसम (IPL 2021) 29 सामन्यांनंतर स्थगित करण्यात आला. यानंतर आता आयपीएलचे उरलेले सामने कुठे खेळवायचे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. बीसीसीआयकडे (BCCI) युएई (UAE) आणि इंग्लंड (England) या दोन देशांचे पर्याय आहेत. इंग्लंडमधल्या 4 काऊंटी क्लबने तर आधीच बीसीसीआयला आयपीएलच्या आयोजनाबाबत ऑफर दिली आहे. यानंतर आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शाह (Jay Shah) इंग्लंडला जाणार आहेत.
18 जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळवली जाणार आहे. इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये हा सामना खेळवला जाईल. ही मॅच पाहण्यासाठी सौरव गांगुली आणि जय शाह उपस्थित राहतील, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितलं.
सौरव गांगुली आणि जय शाह या दौऱ्यात आयपीएलच्या उरलेल्या 31 मॅचबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्डासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. मिडलसेक्स, सरे, वारविकशायर आणि लँकशायर काऊंटी टीमनी आयपीएलचं आयोजन करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. याशिवाय इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन यानेही आयपीएलचं इंग्लंडमध्ये आयोजन करण्यात यावं, अशी मागण केली.
'भारत आणि इंग्लंड यांच्यातली सीरिज संपल्यानंतर थोडा वेळ मिळणार आहे. भारताचे सवोत्तम खेळाडू आधीपासूनच इकडे असतील आणि इंग्लंडचेही खेळाडू उपलब्ध असतील,' असं पीटरसन म्हणाला.