तुषार कोहळे, प्रतिनिधी
नागपूर, 05 मार्च : नागपूर जिल्हा परिषदचे कार्यालय कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट बनले असून या कार्यालयातील 23 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. यात शिक्षण विभागाचे सर्वाधिक 12 कर्मचारी आहे तर पाणीपुरवठा विभागाचे 6 व बाकी इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. यामुळे विशेषत: शिक्षण विभागाच्या कामावर याचा परिणाम पडणार आहे.
मार्च अखेर असल्याने इतर विभागाचे कामे देखील प्रभावित होणार आहे. या पार्श्वभूमीवर 12 मार्चपर्यंत सामान्य नागरिकांना जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश बंद करण्यात आले. एखाद्याला महत्वाचे काम असेल त्यांनी मोबाईल आणि इमेल चा वापर करावा, अशी विनंती जिल्हा परिषदचे कार्यकारी अध्यक्ष योगेश कुंभेजकर यांनी केली.
जिल्हा परिषदेमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी अत्यावश्यक कामासाठी आलेल्यासाठी एक स्वतंत्र टेबल ठेवण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्हा परिषद मुख्यालयात पसरू नये. गर्दीवर नियंत्रण राहावे यासाठी जि.प. प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत.
प्रशासनाने मुख्यालयातील इतर सर्व प्रवेशद्वार बंद केले असून, नवीन इमारतीतील मुख्य प्रवेशद्वार ये-जा करण्यासाठी सुरू ठेवण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्हा परिषदेने प्रवेशाचे इतर मार्ग बंद केले होते. त्यानंतर कोरोनाचे संक्रमण कमी होत असल्याने परिस्थिती पूर्ववत झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जि.प. प्रशासनाने आता पुन्हा प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. दोन्ही जुन्या इमारतींमध्ये प्रवेश करण्यासाठी असलेले विविध प्रवेशद्वार बंद केले असून, केवळ नवीन इमारतीतील प्रवेशद्वारच मुख्यालयामध्ये ये-जा करण्यासाठी सुरू ठेवण्यात आले आहे.
यापूर्वी जिल्हा परिषदेचे 30वर अधिकारी व कर्मचारी संक्रमित झाले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेने आठ दिवस लॉकडाऊनही केले होते. जिल्हा परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्त जिल्हास्तरीय महिला मेळावा व आरोग्य शिबिराचे आयोजन २७ फेब्रुवारी रोजी पारशिवनी येथे करण्यात येणार होते. परंतु 7 मार्चपर्यंत सभा, कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.
Published by:sachin Salve
First published:
नागपूर जिल्हा परिषद कोरोनाचा हॉटस्पॉट, 23 कर्मचारी सापडले पॉझिटिव्ह